ठाणे : आज शिकलेल्या, पायलट, डॉक्टर, इंजिनिअर झालेल्या महिलांचा सत्कार सगळीकडेच होतो आहे. मात्र, तळागाळातील महिलांना करावा लागणारा संघर्ष हा जीवघेणा असतो. तशात नव-याची साथ सुटली तर एकट्याच्या हिकमतीवर घर संसार उभा करणे हे खरे जिद्दीचे असते, हे मला स्वतःच्या आईच्या संघर्षमय जगण्यातून ठावूक आहे. म्हणूनच सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने, तळागाळातील एकल मातांचा सत्कार अतिशय मोलाचा आहे. हीच खरी समता आहे. अशा शब्दात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी जागतिक महिला दिनी समता मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. ठाण्यातील विविध लोकवस्त्यांमधील स्त्री - पुरुषांचा समता मेळावा रविवारी, ८ मार्च रोजी समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. एकट्याच्या हिकमतीवर, घर - संसार सांभाळणा-या ठाण्यातील २१ एकल मातांचा यावेळी महापौर नरेश म्हस्के व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मनिषा जोशी होत्या.
खडतर परिस्थितीवर मात करून लोकवस्तीतील या भगिनी आपल्या मुलांचं पोषण करीत असतात. मी स्वत: त्याच स्थितितून लहानपणी गेलो आहे. लहानपणीचे संस्कारच आयुष्य घडवतात. मला लहानपणी चांगले संस्कार मिळाले नसते तर इथवर पोहोचलो नसतो. असे त्यांनी पुढे सांगितले. ते पुढे म्हणाले की, समता विचार प्रसारक संस्था आज समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी अतिशय महत्वपूर्ण काम करीत आहे. वैचारिक मतभिन्नता असू शकते पण ठाण्यात आज समाजाला पुढे नेण्यासाठी ही संस्था प्रामाणिकपणे कार्यरत आहे, असं ते पुढे म्हणाले. संस्थेचे एकलव्य कार्यकर्ते संजय निवंगुणे, अजय भोसले, लता देशमुख आदींच्या लढाऊ मातांचा यावेळी "एकल माता सन्मान" करण्यात आला.
संघटीतपणे एनपीआरवर बहिष्कार करा!
संविधान अभ्यासक व लेखक सुरेश सावंत यांची 'नागरिकता हक्क आणि संविधान', या विषयावर संस्थेचा कार्यकर्ता अजय भोसले यानी मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने लादलेला सध्याचा नागरिकत्व सुधारणा कायदा हा संविधानातील कलम १४, १५ आणि १६ मधील तरतूदींचा भंग करत आहे. देशभर शाहीन बाग आणि तत्सम आंदोलनात महिलाच अग्रभागी आहेत, असे सांगत त्यामुळेच CAA, NRC, NPR विरोधी लढा वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे. जनगणने सोबतच NPR ची पहाणी करण्याचा घाट सरकारने घातला आहे. पूर्वी NPR मध्ये १५ प्रश्न होते. आता सरकारने ते २१ केले आहेत. त्यातील उत्तरे ठाऊक नसल्यास वा अधिका-यास संशय वाटल्यास अशा नागरिकांना नोटीसा बजावून नागरिकत्व सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली जाईल. हे अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे सर्वांनी संघटीतपणे NPR वर बहिष्कार टाकण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. महिलांच्या अधिकारां बाबत संविधानात अनेक तरतुदी असून त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे आवश्यक असल्याचे, त्यांनी पुढे सांगितले.
प्रसिद्ध कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांनी स्त्री जीवना संदर्भातील कविता व गाणी सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. साध्यांच्या लढाईसाठी, साधाच तिचा एल्गार, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, अशा अनेक कविता आणि गाण्यांधून त्यांनी स्त्री जन्माला सलाम केला. घरामध्ये चार भिंतीच्या आत कष्टकरी महिला महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. केवळ चांगलं घर मिळणं म्हणजे बाईचे सगळे प्रॅाब्लेम जात नाहीत, हेही त्यांनी कवितांच्या माध्यमातून सांगितले.
याशिवाय विविध लोकवस्तीतील मुली - मुले - महिलांनी महिलांच्या प्रश्नावर नाटिका, नृत्य, पपेट शो, अभिवाचन, समतेची गाणी आणि एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. मानपाड्याच्या हिराबाई साळवे व सहका-यांची - समतेची गाणी, राम नगर - मनिषा पाटील यांचे पपेट शो, अनुजा लोहार व सावरकर नगरच्या मुलींचं - मुलींच्या छेडछाडीचा जाब विचारणारं नृत्य, ठाणे महापालिका शाळा क्र. १८ च्या विद्यार्थीनींची, "मासिक पाळी" या विषयावरील नाटिका, इतिहास गाजवणा-या पराक्रमी महिलांवर आधारित लतिका सुप्रभा मोतिराम आणि रुस्तोमजी सोसायटी, माजिवडा येथील महिलांनी सादर केलेले अभिवाचन आणि सुशांत जगतापने नारी शक्ती हे स्वरचित काव्य, असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा लोहार यांनी केले तर आभार प्रदर्शन दुर्गा माळी यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया, डाॅ. संजय मंगला गोपाळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वंदना शिंदे, आयपीएच च्या वैदेही भिडे, शिवाजी पवार, प्रभाकर चौधरी, निशिगंधा चड्डी, नरसी मकवाना आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव हर्षलता कदम, सुनिल दिवेकर, निलेश दंत आदी कार्यकर्त्यांनी विशेष परीश्रम घेतले.