पुणे निगडी – प्रोजेक्ट पेपर आणण्यासाठी दुकानाला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून तिचा विनयभंग केला. तसेच मुलीच्या आईला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीला रिक्षातून ढकलून देऊन आरोपी पळून गेले.
याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. २९) निगडी येथे घडली.
कैलास विटकर (वय ३३), राहुल धोत्रे (वय ३२), अजय शिंदे (वय ३२, ओटास्किम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या २९ वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शनिवारी प्रोजेक्ट पेपर आणण्यासाठी दुकानाला गेली. दुकानात जात असताना तीन आरोपींनी ओटास्किम निगडीमधील एका शाळेपासून तिचे रिक्षातून अपहरण केले. आरोपी कैलास आणि राहुल यांनी मुलीचे तोंड दाबून ‘तुझ्या मम्मीला कसं मारतो बघ’ अशी धमकी दिली. त्यानंतर मुलीला मारहाण करून तिच्याशी गैरवर्तन केले. नंतर मुलीला आरोपींनी यमुनानगर येथील पवळे क्रीडांगणाजवळ रिक्षातून ढकलून दिले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.