कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घराबाहेर न पडण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन


कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थापना पुढील ३१ मार्चपर्यंत बंद
10 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमल्यास कारवाई
परिवहन सेवेची बससेवा 40 टक्केच सुरू
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचा निर्णय
घराबाहेर न पडण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन


ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थापना, शेअर प्रवासी वाहतूक बंद ठेवण्या सोबतच शहरातील गर्दी टाळण्यासाठी रस्त्यावर, चौकांमध्ये कोणत्याही निमित्ताने 10 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. दरम्यान उद्या रविवार 22 मार्च 2020 रोजी देशात जनता कर्फ्यु जाहीर झाल्याने परिवहन सेवेची बससेवा 40 टक्केच सुरू ठेवण्याच्या सूचनाही श्री. सिंघल यांनी दिल्या आहेत. तथापि नागरिकांनी जनता कर्फ्यूला समर्थन म्हणून नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
 
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शहरातील अत्यावश्यक किराणा सामान, दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय वगळून अन्य सर्व दुकाने, आस्थापना तसेच हॉटेल्स, बिअरबार, वाईन शॉप दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत पुढील आदेश होई पर्यंत बंद ठेवण्यात यावीत असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. 
     
सर्व खाजगी कंपनी, खाजगी आस्थापना, सल्ला देणाऱ्या  संस्था, माहिती व तंत्रज्ञानक्षेत्रातील आस्थापना, सर्व उद्योग, व्यवसाय, व्यापार आदी दिनांक 31 मार्च पर्यत बंद ठेवण्यात येणार असून त्यांनी घरातूनच काम करावयाचे आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा, लागणारी उत्पादने निर्माण करणाऱ्या कंपन्या, आस्थापना यांना वगळण्यात आले आहे. 
     
किराणामालाची दुकाने, औषधालय, दुधाची व भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुची दुकाने मात्र चालू  ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 


शहरातील गर्दी टाळण्यासाठी रस्त्यावर, चौकांमध्ये कोणत्याही निमित्ताने 10 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. एकत्र जमल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात रविवार दिनांक २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७.०० ते रात्रौ ९ .०० या वेळेत जाहीर केलेल्या संचारबंदीच्या (जनता कर्फ्यू) अनुषंगाने परिवहन सेवेची बससेवा 40 टक्केच सुरू राहणार आहे.


कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था/ संघटना यांच्यावर महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेचे सर्व उपआयुक्त, परिमंडळे, संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयाने सदरची कारवाई करण्यात येणार आहे.


नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने महापालिका भवनात पदाधिकारी, अधिकारी यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना प्रतिबंध केले असून संबंधित अभ्यागतांना भेटणे जरुरीचे आहे की याची खातरजमा करून मुख्यालय व प्रभागसमितीमध्ये दैनंदिन फक्त 5 अभ्यागतांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.


नागरिकांनी या सर्व सुचनांचे पालन करून कोरोनाचे संकट दूर करण्यास महापालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


—————


कोरोना आजारा संदर्भाने पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल होत आहे, त्या संदर्भाने केलेला हा कलमांचा उहापोह


कायदा क्र.1


 IPC


188 -आदेशाची अवज्ञा
269 -संसर्ग पसरायची हयगयीची कृती
270- घातक कृती
271- संसर्गजन्य आजार पसरवू नये म्हणुन दळणवळणची साधने याबाबत शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे
290- सार्वजनिक उपद्रव
505(२) -अफवा पसरविणे


कायदा क्र.2


राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005
कलम 51 ब - दिलेले आदेश न पाळणे उदा.दुकान, पान टपरी, हॉटेल, आस्थापना उघडे ठेवणे.
कलम - 52, 54 अफवा पसरविणे.


कायदा क्र.3


महाराष्ट्र पोलीस कायदा
कलम- 37 (3) 135  जमावबंदी आदेश उल्लंघन


कायदा क्र. 4


औषध द्रव्ये तीलस्ती (आक्षेपार्ह जाहिराती)1954
कलम - 3,4,5
एखाद्या औषधाने कोरोना बरा होतो अशी जाहिरात करणे.


(यासोबत महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 व साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 लागतील, याबाबतीत पुस्तक, नियमावली जिल्हाधिकारी कार्यालयात मिळेल.)