लातूर : राज्यातील महाविकास आघाडीचे शासन सर्व घटकांना मदत करणारे शासन आहे. राज्यातील इंडियन रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोसिएशनच्या संदर्भातील सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी शासन व असोसिएशन मधील दुवा म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
महाराष्ट्र स्टेट ब्रँच ऑफ इंडियन रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोसिएशन, लातूर यांच्या वतीने 43व्या आयोजित वार्षिक परिसंवाद कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी त्यांनी केले. या कार्यक्रमास आमदार संजय दौंड, अभिमन्यू पवार, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थानचे अधिष्ठता डॉ.गिरीष ठाकूर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.संजय ढगे, आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, डॉ.गिरीष मैंदरकर, डॉ.अजय जाधव उपस्थित होते.
या वार्षिक परिसंवाद कार्यक्रमास मार्गदर्शन करताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्व घटकांना मदत करणारे आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकासाच्या कामाकरिता सदैव तत्पर आहेत. मी सरकार व तुमच्या मधील दुवा म्हणून विकासाची कामे मार्गी लावणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लातूर येथे लवकरच सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात होत असून माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांचे स्वप्न पूर्णत्वास होत आहे. त्याचे लोकार्पण लवकरच होणार आहे. असे नमूद करुन राज्यातील रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोसिएशनच्या संदर्भातील सर्व कामाच्या अडचणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे बैठक आयोजित करुन दूर केल्या जातील, असे अश्वासन दिले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.दिलीप लाखर, डॉ.सुरेश चांडक, डॉ. राजेंद्र शिवडे व डॉ.रमेश मलानी यांना जिवन गौरव पुरस्कार तर डॉ.श्लोक लोलगे, डॉ.हेमंत पटेल व डॉ.दीपक पाटकर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आमदार संजय दौंड, आमदार अभिमन्यू पवार, डॉ.गिरीष मैंदरकर, डॉ.संदीप कवठाळे यांची समयोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमात डॉ.संजय कवठाळे यांच्याकडे रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून सुत्रे देण्यात आली. कार्यक्रमास राज्यभरातून व राज्याबाहेरील प्रसिद्ध डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.गिरीष कोरे यांनी केले. प्रस्ताविक डॉ.प्रशांत ओंकार तर डॉ.अनिल घुगे यांनी मानले.