मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जनता कर्फ्युमुळे ओस


लोणावळा : जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने एरवी वाहनांच्या वर्दळीने गजबजलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज (रविवारी) सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला.


कोरोना या साथीच्या आजाराने देशभरासह मुंबई पुणे ठाणे या शहरांमध्ये थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आव्हान महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच देशभरातील जनतेने आज जनता कर्फ्यू पाळत घराबाहेर न पडण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.याचा परिणाम मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर देखील झाला आहे. 


नागरिक तसेच पर्यटक घराबाहेर पडत नसल्याने सतत वर्दळीचा असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ओस पडला आहे. रस्त्यावर अतिशय तुरळक वाहतूक असून खंडाळा घाट परिसर देखील मोकळा पहायला मिळत आहे. वाहनांच्या रांगांनी गजबजणारे टोल नाके आज मात्र रिकामे-रिकामे पहायला मिळत आहेत. द्रुतगती मार्गावर अगदीच नगण्य संख्येने वाहने दिसत आहेत.