देहूरोड परिसरातील डोंगराला भीषण आग; शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी


पुणे : देहूरोड परिसरात अय्यपा मंदिराच्या मागील बाजूस डोंगराला आज (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास अज्ञाताकडून आग लावण्यात आली. त्यामुळे लागलेल्या वणव्याने अल्पवधित रौद्र रूप धारण केले व शेकडो वृक्ष या आगीच्या भक्षस्थानी सापडले. दरम्यान, फायर ब्रिगेड व लष्कराची वाहने घटनास्थळी पोहचली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


आगीचे वृत्त कळताच प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, विजय जगताप, अर्चना घाळी, अमोल कानु, विशाल शेवाळे, तेजस सापरिया, समीर चिले, जयेंद्र मकवाना आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आगीने संपूर्ण डोंगर परिसराला व्यापल्याने आग विझवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे.


या बाबत प्रत्यक्षदर्शी विजय पाटील म्हणाले, आगीमुळे जवळजवळ १५ हेक्टर पेक्षा जास्त भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. आग डोंगर उतारावर वेगाने पसरत असल्याने तसेच लष्कर परिसर आणि डोंगर भाग यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक वाहनांना तिथपर्यंत पोहचण्यास अडचण होत आहे.