दोन लाखाची खंडणी घेणाऱ्या सरपंचास अटक


नगर -  जामखेड तालुक्यातील पिंपळगाव ऊंडा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाखाची खंडणी घेणाऱ्या तिघांना जामखेड पोलिसांनी जेरबंद केले. 


आपटी गावचे सरपंच नंदकुमार प्रकाश गोरे (वय ३०), सचिन बबन मिसाळ (वय ३४), वाल्मिक किसन काळे (वय २४ सर्व रा.आपटी ता.जामखेड) असे पकडण्यात आलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत.


याबाबत समजली माहिती अशी की, सोमनाथ शिवदास जगताप यांना त्याच्या राहत्या घरी आरोपी गोरे, मिसाळ या दोघांनी जगताप यांना दोन गावठी कट्ट्याचा धाक दाखवून हाँटेल चालविण्यासाठी शिविगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली, आणि तेथील लोकांवर दहशत निर्माण केली. तसेच जगताप यांना इनोव्हा गाडीत बळजबरीने टाकून आरोपी गोरे याच्या पत्र्याच्या शेडवर नेऊन जगताप यांना जबर मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.


जगताप यांना डांबून ठेवून त्यांच्या वडिल व चुलते यांच्याकडून दोन लाखाची खंडणी दिल्यानंतर सोडून दिले. पोलीसात तक्रार दिल्यास तुम्हाला संपवून टाकू, अशी धमकी दिली. या घटनेच्या भितीमुळे जगताप हे पोलीसात तक्रार देण्यास तयार नव्हते. परंतु लोकांनी धीर दिली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे जाऊन सोमनाथ जगताप यांनी फिर्याद दिली.


त्यानुसार खंडणीखोरावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर या घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना दिलेल्या आदेशानुसार कर्जत एसडीपीओ कार्यालयातील कर्मचारी व आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी अशा दोन पथकांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला.


जवळके (ता.जामखेड) शिवारात पोलीसांनी सापळा लावून मोठ्या शिताफीने खंडणीखोरांना पकडण्यात आले. यानंतर खंडणीखोरांना न्यायालयात उभे केले असता, त्याना पोलीस कस्टडी रिमांड दिला, यात खंडणीखोराकडून दोन पिस्तुल, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी आणि ४० हजार रुपये जप्त करण्यात आले.