सिव्हिल हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालयांना पायाभूत वैद्यकिय वस्तूंचा पुरवठा
अमरावती : स्थानिक बेस्ट प्राइज स्टोअर येथून खरेदी करणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा व्हावा यासाठी वॉलमार्ट इंडिया महत्त्वाची भूमिका बजावते आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या बेस्ट प्राइज स्टोअर्समधील सर्व कर्मचारीवर्ग, शहरातील सिव्हिल हॉस्पिटल आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना लागणाऱ्या पायाभूत वैद्यकीय वस्तूंच्या मागणीची पुर्तता करण्यासाठी अथकपणे सेवा देत आहेत.
बेस्ट प्राइज अमरावती येथून अत्यावश्यक वस्तू जसे की बादल्या, साबण, कचऱ्याच्या पिशव्या, बेडशीट इत्यादींचा पुरवठा झाला असून या गोष्टींचा वापर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्ड मध्ये केला जातो आहे. अत्यंत कमी वेळेत, घाऊक प्रमाणात या वस्तू उपलब्ध करुन दिल्याबद्दल स्थानिक प्रशासनाने बेस्ट प्राइज स्टोअर्सचे आभार मानले आहेत.
“या आव्हानात्मक काळात स्थानिक प्रशासनाला आपल्या परीने मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि त्या योगे गरजू लोकांना मदतीचा हात देता आल्याबद्दल वॉलमार्ट इंडियाला अत्यंत सन्मानित वाटते आहे. या काळात आलेल्या वाढीव डिलीवरीची गरज पूर्ण करण्यासाठी वॉलमार्ट इंडियाने अतिरिक्त डिलीवरी भागिदारांची नेमणूक केली आहे. डिलीवरी टीममधील सर्व कर्मचारी मास्क, हँड सॅनिटायझर आणि हातमोज्यांसारख्या पीपीई गोष्टींचा वापर करत आहेत तसेच माल चढवण्यापूर्वी डिलीवरीची वाहने पूर्णपणे निर्जंतूक केली जात आहेत. आमच्या ग्राहकांना आणि पर्यायाने समाजाला अशा वेळी सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे वॉलमार्ट इंडियाचे प्रवक्ते यानी माहिती देताना सांगितले.