मुंबई - मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ जहाजावर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी स्वतः संपर्क साधून विनंती केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. गुरुवारी सकाळपासून या जहाजावरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरविणे सुरु होईल. त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार आहे. त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘मरिला डिस्कव्हरी’बाबतच्या निर्णयाचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेले हजारो खलाशी व जहाजावरील कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे.
मरिला डिस्कव्हरी हे जहाज २ ते ६ एप्रिल या कालावधीत कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहचणार होते. दरम्यान कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या जहाजाने थायलंड येथे १४ मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. त्यानंतर १२ एप्रिल रोजी हे जहाज कोचीन येथे पोहचले पण या जहाजावरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर हे जहाज मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी पोहचले आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. हे जहाज पुढे नॉर्वेसाठी रवाना होणार आहे.
जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. थायलंड सोडून ३७ दिवस होऊन गेले मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सांगूनही परवानगी मिळत नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब नौकानयन मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. राज्य शासनाचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया हे देखील सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यानंतर अखेर काल रात्री यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने एक आदेश काढला.
या आदेशानुसार व्यापारी व व्यावसायिक जहाजांवरील कर्मचारी, खलाशी यांना भारतीय बंदरांवर उतरणे तसेच बंदारांवरून जाणे शक्य व्हावे म्हणून निश्चित कार्यपद्धती दिली आहे. यानुसार या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती कळविणे, तसेच बंदरावर उतरल्यावर कोविड चाचणी करून घेणे, प्रसंगी क्वारंटाईन करणे, या खलाशी व कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रांझिट पास, वाहनाची व्यवस्था आदी बाबींचा समावेश आहे. याचा आदेशाचा फायदा समुद्रात सध्या विविध जहाजांवर अडकलेल्या हजारो भारतीय खलाशांनाही होणार आहे.