परराज्यातील कामगारांसाठी विशेष रेल्वेगाडी सोडणे सद्यातरी अशक्य : नितिन गडकरी


नवी दिल्ली -  परराज्यातील कामगार, मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी स्पेशल ट्रेनची सोय करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा आम्ही सन्मान करतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य ठरेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.


तसेच मुंबईतून या परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी ट्रेन सोडली, तर कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठीची शिस्त पाळली जाईल का ? याची तुम्ही गॅरंटी घ्याल का ? स्टेशनवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवासी प्रवास करतील, हे शक्य आहे का? असा सवाल नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मागणीवर उपस्थित केला आहे.


वांद्रे स्टेशन बाहेर काय झालं हे सर्वांनी पाहिलं. अशी ट्रेन सोडली आणि ट्रेनमध्ये गर्दी झाली किंवा त्यानंतर दिल्लीच्या निजामुद्दीन कार्यक्रमातून कोरोनाचा प्रसार झाला, तसं काही घडलं तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित करीत अशी स्पेशल ट्रेन सोडणे सध्यातरी अशक्य असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सध्याच्या स्थितीत असं करणे गंभीर आहे. त्यामुळे असा काही निर्णय घेणे अयोग्य ठरेल. पुढच्या काळात नक्की खबरदारी घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.


परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहे, ते त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का? याचा विचार केंद्र शासनाने करावा. एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.