'फेसबुक' करणार रिलायंस जिओ कंपनीत ४३ हजार ५७४ कोटींची गुंतवणूक


मुंबई – सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ‘फेसबुक’ने रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्याचा फेसबुक आणि जिओ या दोन्ही कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. फेसबुक जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून करण्याची घोषणा केली. 


सोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के शेअर्स खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने जिओसोबत एक करार केला असून तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये करणार आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल असे सांगितले जात आहे. रिलायन्स जिओने बाजारात येताच अनेक कंपन्यांपुढे मोठे आव्हान उभे केले होते. केवळ चार वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओनं 38 कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला होता.


या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्य 4.62 लाख कोटी रुपये झाले आहे. कंपनीच्या मूल्याप्रमाणे शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी आता केवळ चार कंपन्या या रिलायन्स जिओच्या पुढे आहेत. त्यापैकी एक रिलायन्स जिओची मातृसंस्था रिलायन्स इंडस्ट्रीज हीदेखील आहे. त्याव्यतिरिक्त टीसीएस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्या जिओच्या पुढे आहेत.


फेसबुकने केलेल्या या गुंतवणुकीमुळे रिलायन्स जिओच्या पायाभूत सुविधांच्या जाळ्यात आणखी वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना देखील अधिक चांगल्या व स्पर्धात्मक सेवेचा लाभ मिळू शकेल, असा दावा रिलायन्स जिओच्या वतीने करण्यात आला आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्रात ही घटना खूप महत्त्वपूर्ण मानली जात आहे.