ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरुग्ण विभाग सुरु


ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची होणार तपासणी


ठाणे : ठाणे शहरात कोरोना कोव्हीड -१९ या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी आणि रुग्णांची तात्काळ तपासणी करणे सोयीस्कर व्हावे यासाठी ठाणे शहरामध्ये प्रभाग समितीनिहाय 15 महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये तर 5 खासगी रूग्णालये अशा एकूण 20 ठिकाणी ताप बाहयरुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. या बाह्यरूग्ण विभागामध्ये केवळ ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे याप्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीच तपासणी करण्यात येणार आहे. ठाणे शहरात कोरोना कोव्हीड - १९ या आजाराच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के यांनीही पाठपुरवठा केला होता.


प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरुग्ण विभागात महापालिकेच्या 15 आरोग्य केंद्राचा समावेश आहे. यामध्ये कौसा आरोग्य केंद्र, दिवा केंद्र, कळवा आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, किसननगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, नौपाडा आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, काजुवाडी आरोग्य केंद्र, कोपरी आरोग्य केंद्र, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, गांधीनगर आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरस आरोग्य केंद्र, आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्र या महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे तर कौशल्या हॉस्पीटल, ठाणे ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पीटल, ठाणे वेदांत हॉस्पीटल, जितो एज्युकेशनल अॅन्ड मेडिकल ट्रस्ट या 5 खाजगी हॉस्पिटलमध्ये ताप बाह्यरूग्ण तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.


ताप बाहयरुग्ण विभाग सुरू केलेल्या आरोग्य केंद्रांमधील जनरल ओपीडी पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येणार असून सदर विभाग दैनंदिन सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत कार्यान्वित राहणार आहेत. तसेच महापालिका दवाखान्यांमध्ये अँटीरेबिज उपचार आणि आरोग्य केंद्रातील इतर लसीकरणासाठी आदी उपचार दुपारी २.०० नंतर सुरु ठेवण्यात येणार आहेत.


ताप बाहयरुग्ण विभागाकरीता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करण्यात येणार नसून याठिकाणी केवळ ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे याप्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रातील रुग्णांचे कमी स्वरूपाची लक्षणे, मध्यम स्वरूपाची लक्षणे आणि अतिशय तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारे रूग्ण तीन विभागामध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे.


वैद्यकिय अधिकारी त्यांच्या वैद्यकिय अहवालानुसार रुग्णांची वर्गवारी केल्यानंतर ज्या रुग्णांची कोविड तपासणी करणे आवश्यक आहे अशा रुग्णांना (कॅटॅगरी १ माईल्ड केसेस) भाईंदरपाडा येथील कोरोना केअर सेंटर येथे अॅम्ब्युलन्सव्दारे पाठविण्याचा निर्णय घेतील. भाईंदरपाडा येथे सदर रुग्णांना दाखल करुन त्यांचे स्वॅब घेण्यात घेवून सदर ठिकाणी या रुग्णांना त्यांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत ठेवण्यात येणार आहे. सदरचे रुग्ण कोविड पॉझिटीव्ह आढळल्यास त्यांना पुढील उपराचारार्थ सिव्हील हॉस्पिटल ठाणे किंवा होरायझोन प्राईम हॉस्पिटल, पातलीपाडा येथे प्राधिकृत कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येईल.


फिव्हर ओपीडीमध्ये आलेल्या कॅटॅगरी २ व ३ मधील रुग्णांना पुढील उपचारार्थ व तपासणीकरीता त्यांच्या क्षमतेनुसार बेथणी हॉस्पिटल, पोखरण २ किंवा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे संदर्भित करण्यात येणार आहे. बेथणी हॉस्पिटल व छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे रुग्णांची थ्रोट स्वॅब व्दारे तपासणी करुन पुढील निदान करण्यात येणार आहे.


फिव्हर ओपीडी मध्ये आलेल्या रुग्णांकरीता स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात येणार असून रजिस्टरमध्ये रुग्णाचे नाव संपूर्ण पत्ता, संपर्क तपशिल इत्यादी माहिती घेण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना संदर्भसेवा देणे आवश्यक नसेल अशा रुग्णांना ओपीडीमधूनच औषधोपचार दिला जाणार आहे. फिव्हर ओपीडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जनरल ओपीडी मधील रुग्णांचा समावेश होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.


रुग्णांना संदर्भित करण्याकरीता प्रभाग समिती निहाय १ अम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आली असून फिव्हर ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करताना वैद्यकिय अधिकारी आणि रुग्णांना संदर्भसेवा देताना अॅम्ब्युलन्सवरील सर्व कर्मचाऱ्यांनी देखील पीपीई किटसचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे.