पुणे : शहरात कोरोनाने तिसरा बळी घेतला आहे. निगेटीव्ह रिपोर्ट आल्याने रुग्णालयातून घरी सोडलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा तिच्या घरातच मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या चाचणीचे अहवाल तपासले असता ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे कोरोना चाचणीच्या विश्वासाहर्तेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
चाचणीचा अहवाल बरोबर असेल तर निगेटीव्ह रुग्णातही नंतर पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, या शक्यतेने शहरातील नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. या बाबत डॉक्टरांनी तसेच प्रशासनाने आवश्यक तो खुलासा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वी पुण्यात एका ५३ वर्षीय पुरुष व ४६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता आणखी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने शहरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या तीन झाली आहे. येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात राहणारी ही महिला हो्ती. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुण्यातील हा कोरोनाचा तिसरा बळी ठरला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.
या तिसऱ्या महिलेला यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने तिला घरी सोडण्यात आले होते. त्या महिलेचा घरीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह ससून रुग्णालयात आणण्यात आला. त्या ठिकाणी परत तपासणी केली असता तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित मृत रुग्णांचा आकडा तीन झाला आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६० रुग्ण हे पुणे शहरातील तर २१ जण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. या व्यतिरिक्त ७ जण ग्रामीण भागातील आहेत.आतापर्यंत पुणे शहरातील ९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आणखी पाच रुग्णांची १४ दिवसांनंतरची चाचणी निगेटीव्ह निष्कर्ष देणारी ठरली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या टप्प्यातील १२ ही रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. पिंपरीत नवीन सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.