आपण लढणार आपण जिंकणार..  - उद्धव ठाकरेंचा ‘आत्मविश्वास पर’ संदेश


मुंबई - करोनाविरोधात महाराष्ट्राची, देशाची लढाई अत्यंत नेटाने सुरु आहे. सगळा देश करोनाविरोधातली लढाई लढतो आहे. अशात महाराष्ट्राने देशाला आदर्श घालून द्यावा अशी इच्छा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली होती. आरोग्य सुविधा, करोनाच्या चाचण्या, रुग्ण आढळल्यास तो विभाग सील करणं, विशेष काळजी घेतली जाणं हे सगळं काम ठाकरे सरकारकडून केलं जातं आहे. आता करोनाविरोधात लढणाऱ्या लढवय्यांसाठी म्हणजेच आपले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागातले कर्मचारी, पोलीस, स्वच्छता विभागातले कामगार यांचे मनोधैर्य वाढवणारा व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर आणला आहे. आपण लढणार आपण जिंकणार असा पॉवरफूल संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.


देशभरातला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळा देश बंद आहे. महाराष्ट्रातली मुंबई, कोल्हापूर आणि इतर महत्त्वाची ठिकाणं लॉकडाउनमुळे कशी शांत झाली आहेत हे दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा येतो. त्यामध्ये दिसतात ते करोना विरोधात नेटाने लढा देणारे लढवय्ये... म्हणजेच डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस.. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा एकच फोटो येतो आणि त्याभोवती संदेश येतो आपण लढणार आपण जिंकणार!


महाराष्ट्रात आणि खासकरुन मुंबईत बाहेरुन येणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे इथे करोनाचे रुग्ण वाढले आहेत. मुंबईत तर जगभरातले लोक येतात. त्यामुळे रुग्णसंख्या जास्त आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच डॉक्टर, नर्सेस, पोलीस या सगळ्यांना त्यांनी हात जोडून अभिवादनही केलं. आता याच सगळ्या लढवय्यांचं मनोधैर्य वाढवणारा हा व्हिडीओ समोर आणला आहे. करोनाविरोधातली लढाई जिंकायचीच आहे हा निर्धार करा असंच या व्हिडीओतून उद्धव ठाकरे सांगत आहेत. तेही एक शब्द न बोलता... अत्यंत सकारात्मक परिणाम साधणारा हा व्हिडीओ शिवसेनेतर्फे पाठवण्यात आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=9cArCV-YwDw&feature=youtu.be