अमरावती : अमरावती येथे वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमिवर वॉलमार्ट तर्फे सर्व प्रकारची सुरक्षितता बाळगण्यात येत असून या आव्हानात्मक परिस्थितीतील सर्वात मोठी प्राथमिकता ही त्यांच्या कर्मचाऱ्यांची व ग्राहकांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य उत्तम राखणं ही आहे असे स्पष्टीकरण वॉलमार्ट तर्फे करण्यात आले आहे. वॉलमार्टच्या सेवेसंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले.
वॉलमार्ट ने स्पष्टीकरण देतांना पुढे म्हटले आहे की, सुरक्षित सामाजिक व शारीरिक अंतर ही गरज असलेल्या या काळात समाजाला त्यांच्या जीवनावश्यक वस्तू मिळत राहण्यात आमची भूमिकाही आम्हाला माहिती आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत असलेल्या स्थानिक प्रशासनाचे आम्ही आभारी आहोत. जीवनावश्यक वस्तू सुरक्षितपणे ग्राहकांना पुरविण्याचे काम आम्ही करत असल्याने सर्व आवश्यक दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनासोबत कार्यरत आहोत. त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि सर्व आवश्यक माहिती त्यांना देऊ. सुरक्षित कार्यपद्धतीचा विचार करता कर्मचारी, ग्राहक आणि इतर संबंधितांसाठी (थर्ड पार्टी रिसोर्सेस) सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण ठेवणे हे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे. स्वच्छता आणि सुरक्षेच्या उत्तम उपायांविषयी सातत्याने त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करतो आहोत. प्रत्येक स्टोअरच्या प्रवेशद्वारावर आम्ही हात धुण्याची सोय उपलब्ध करुन दिली असून प्रत्येक स्टोअरमध्ये ठिकठिकाणी हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन दिले आहेत. तपमान तपासण्यासाठी स्टोअरमध्ये स्पर्श न करता वापरता येणारे थर्मामीटरसुद्धा उपलब्ध आहेत. ताप असलेल्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत असून स्टोअरमध्ये अधिकाधिक स्पर्श होणारी ठिकाणी सातत्याने स्वच्छ केली जातात आणि निर्जंतुक केली जातात. थर्ड पार्टी रिर्सोसेसने सुद्धा मास्क आणि ग्लोव्हस वापरावे याची खात्री आम्ही करत आहोत. कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यात याची मदत होईल आणि या काळात सुरक्षितरित्या आमचे सदस्य व समाजाची सेवा करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असेही वॉलमार्ट प्रवक्त्यांनी सांगितले आहे.