ठाणे : लागोपाठ सुमारे दोन महिने देशात लॉकडाउनमुळे हातावर पोट असणार-या लोकांना अतिशय बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते आहे. अश्यावेळी ठाण्यातल्या ५१ लोकवस्तीं मधील ११९१ कष्टकरी गरजू कुटुंबीयांपर्यंत मदत पोहोचवण्याची जबाबदारी समता विचार प्रसारक संस्थेने पार पाडली आहे. ५ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, ५ किलो आटा, १ किलो तेल, आंघोळीचा व कपड्याच्या साबण १ - १ नग, हळद, मीठ आदी जीवनावश्यक वस्तू/ धान्यपुरवठा संस्थे तर्फे करण्यात आला. ही मदत संस्थेतील गेल्या अनेक वर्षातील गरजू एकलव्य विद्यार्थी, नाका कामगार, कंत्राटी व स्थलांतरीत मजूर, घरेलू कामगार, कचरा वाचक, रिक्षा चालक, आदी हातावर पोट असणा-या लोकांना करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष मदत कार्याबरोबरच, कष्टकरी जनतेच्या वेदनांचे शासनामार्फत निवारण होण्यासाठी, ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिका यांच्या मार्फत शासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे कामही संस्थे तर्फे सुरु असल्याचे, या प्रकल्पाचे संयोजक अजय भोसले यांनी सांगितले.
हे काम फार दिवस करावे लागणार नाही असं वाटलं होतं, पण अजूनही गरजू भेटत आहेत. लाॅकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असला तरी पुढे लाॅकडाऊन कालावधी वाढण्याबाबत सरकारने संकेत दिले आहेत. हजारो मजूर आपापल्या गावी जात असले तरी ठाण्यात मोठ्या प्रमाणात गरीब श्रमिक वर्ग आहे. त्यांचे रोजगार बुडाले आहेत. शासकीय मदत काही गरजूं पर्यंत पोहचत नाहीये. अश्या बिकट स्थितीत, मदतीचे हे काम निरंतर सुरु ठेवणे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे, असं संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया म्हणाले. त्यामुळे सहयोगी संस्था आणि दानशूर देणगीदार यांच्या सहाय्याने हे काम यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेने केला असल्याचे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले. संस्थेतर्फे गेले सुमारे पन्नास दिवस सुरु असलेला "कोरोना लाॅकडाऊन अन्नपूर्णा प्रकल्प - क्लॅप" यशस्वी करण्यासाठी अमित मंडलिक, मंगेश गुप्ता, घनश्याम मिश्रा, प्रवीण खैरालिया, सुजित भाल, सुनील दिवेकर, रवी नायडू, दिपाली सावंत - पाटील, राहूल सोनार, स्नेहल राठोड, वैष्णवी कारंडे, सीमा श्रीवास्तव, शोभा वैराळ आदी कार्यकर्त्यांनी स्वतःची काळजी घेत, विशेष परिश्रम घेतले, अशी माहीती संस्थेच्या लतिका सु. मो. यांनी दिली. या प्रकल्पात जाग, श्रमिक जनता संघ, तेजस्विता प्रतिष्ठान, फीडींग इन इंडिया, वुई टुगेदर फाऊंडेशन, म्युज फाऊंडेशन, झेप प्रतिष्ठान या संस्थांचे आणि हर्षदा बोरकर, शिवाजी पवार, कल्पना देवधर व सुनीती मोकाशी या हितचिंतकांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे, मीनल उत्तुरकर यांनी सांगितले.
स्थलांतरित मजूरांना गावी जाण्यासाठी मार्गदर्शन व मदत!
स्थलांतरित मजुरांना सन्मानाने त्यांच्या मूळ गावी - घरी पोहोचवण्याच्या दृष्टीने, मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नतही संस्था सक्रिय सहभागी आहे. ठाणे शहरात असलेल्या स्थलांतरीत मजुरांची शासनाने प्रवासासाठी सोय उपलब्ध करून देण्यासाठी जन आंदोलन राष्ट्रीय समन्वयाचे संयोजक डाॅ. संजय मंगला गोपाळ यांचे मार्फत यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. याकामी ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी पाटील साहेब, जिल्हा नोडल अधिकारी श्रीमती रेवती गायकर, पोलिस उपायुक्त डिसीपी बाळासाहेब पाटील आदींचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. ज्या गरजूंना मदत हवी असेल त्यांनी ९८६९९८४८०३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सुनील दिवेकर यांनी केले आहे.