पडघा, ठाणे - कोरोनाच्या लढाईत प्रत्यक्षपणे कार्यरत असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्कर यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वितरण करण्यात आले.
गुरुवारी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत पडघा आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट पुरवणार सव्वा लाख फेसशिलड्स श्री. देशमुख यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर करत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर विविध विभागाचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.
जनताही उत्तम सहकार्य करत आहे, त्यामुळे आपण कोरोनावर मात करून ही लढाई नक्की जिंकू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शासन करत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या नेटवर्कच्या माध्यमातून अशा प्रकारे मदत राज्यभर पोहचवण्यात आली आहे.
याच उपक्रमाचा दुसरा टप्पा आज पासून सुरू होत आहे. राज्यभरातील ‘आशा वर्कर’ ना या फेसशिल्डचे वितरण आजपासून सुरूवात करण्यात येत आहे. ‘आशा वर्कर’ या देखील रूग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असल्याने त्यांना स्वसंरक्षणासाठी या सुरक्षाकवचाचा फायदाच होईल असे श्री.देशमुख म्हणाले.