तळेगाव - नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले. यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याच्या शोध सुरू आहे. बेबडओहोळ (ता. मावळ) येथे सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली.
संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) असे बुडून मृत्यू झाल्याचे नाव आहे. तर आर्यन दीपक आलम (वय १३, रा. बेबडओहोळ) याचा सायंकाळी उशीरापर्यंत शोध सुरू होता.
संतोष हा विवाहित असून एक दिवसापूर्वी तो बेबडओहोळ येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहोताना दोघेही पाण्यात बुडाले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग पथक लोणावळा आणि मारूंजी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल तसेच एनडीआरएफचे पथक घटनासथळी दाखल झाले. या पथकांनी दोघांचा शोध घेतला. त्यावेळी संतोषचा मृत्यूदेह लगेच सापडला. मात्र, आर्यनचा शोध लागला नाही. सायंकाळी उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते.