राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल-मुख्यमंत्री भेट


मुंबई –  राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. राज्यातील विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली आहे.


महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या नऊ जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला २४ एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील नऊ जागा भरण्याची विनंती केली आहे. दरम्यान, राज्यातील विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी आज (१ मे) केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन दिली आहे.


राज्यपालांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, “केंद्र सरकारने देशात लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक शिथिल उपायांची घोषणा केली आहे. विधानपरिषदेच्या जागांवर निवडणुका काही विशिष्ट मार्गदर्शक सूचनांसह होऊ शकतात, असे ते म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना निवडणूक आयोगाला पत्र लिहावे अशी विनंती करणारे पत्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी काल संध्याकाळी त्यांना दिले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे २०२० पूर्वी परिषदेची निवड होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या नऊ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. दरम्यान, राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन दिली आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या नऊ जागांची निवडणूक त्वरित घेण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्यपालांच्या या निर्णयाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय गृह मंत्रालयाशी सल्लामसलत शक्य तितक्या लवकर निवडणूक घेण्याचा निर्णय घेईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यामुळे कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र अस्थिरतेत जाण्यापासून दूर राहण्याबरोबरच आपल्या राज्यघटनेची मूल्ये देखील टिकवून ठेवता येईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची जागा ही मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री होण्यासाठी असू नये, हा संकेतही या पर्यायामुळे पाळला जाऊ शकतो, असेही फडवणीस यांनी म्हटले आहे.